Ad will apear here
Next
धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत
२६ नोव्हेंबर हा  भारतातील धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन आणि ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय.....
.........
भारतातील धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन :  
 २६ नोव्हेंबर १९२१ हा भारतातील धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचा जन्मदिन. जगभरात ‘मिल्क मॅन’ अशी ओळख असणाऱ्या कुरियन यांनी भारतात ‘अमूल’च्या माध्यमातून देशात दुग्ध क्रांती घडवली. १९४० मध्ये मद्रास येथील लॉयला कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी. ई.ची पदवी मिळवली. त्यानंतर टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ते सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम. एस्सी झाले.

भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक गुजरातमधील  आणंद येथे असलेल्या सरकारी डेअरीमध्ये झाली. त्या सुमारासच ‘खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड’ ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्या वेळी पोलसन कंपनी स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबईसारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. त्यामुळे स्थानिकांची नाराजी व रोषाला पोलसनला तोंड द्यावे लागत होते. 


या कंपनीविरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या सोडवणे, योग्य भाव देणे असे प्रयत्न करत, ‘केडीसीएमपीयूएल’ ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. या कंपनीचे  तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले. वर्गीस कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ‘केडीसीएमपीयूएल’मध्ये काम करण्याचे ठरविले. ‘गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड’ या पालक संस्थेने १४ डिसेंबर १९४६ रोजी ‘केडीसीएमपीयूएल’चे नाव बदलून ‘आणंद मिल्क युनियन लिमिटेड’ असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच; पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य, विशेषतः महिला वर्ग ‘आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीस कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत ‘अमूल’चे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला.

तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले. ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेले कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधापासून पदार्थ तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते; पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी, तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यातही यश प्राप्त केले. हळूहळू ‘अमूल’ने बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले. आजच्या घडीला ‘अमूल’ची उत्पादने भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिका, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचली आहेत. या यशाचे संपूर्ण श्रेय वर्गीस कुरियन यांना जाते. 

भारत सरकारने वर्गीस कुरियन यांना १९६५ मध्ये पद्मश्री, १९६६ मध्ये पद्मभूषण, १९८६ला कृषीरत्न, तर १९९९ मध्ये पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित केले. वर्गीस कुरियन यांच्या धवल क्रांतीने प्रेरित होऊन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ‘मंथन’ हा सिनेमा बनवला. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मितीही सहकार तत्वावरच झाली होती. ‘अमूल’चे छोटे छोटे भागधारक शेतकरी या चित्रपटाचे निर्माते होते. स्मिता पाटील व नसिरुद्दीन शहा यांचा हा चित्रपट न्यूयॉर्कमध्ये २५ आठवडे चालला. वर्गीस कुरियन यांचे नऊ सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.


ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत :
तबलावादनात आपला वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी धुळे येथे झाला. वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर चंद्रकांत कामत यांनी बालनट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नाटक कंपनीच्या दौऱ्यांमध्येच त्यांनी तबलावादकांकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. शंकर शिवलकर, रामभाऊ वष्ट, पंढरपूरचे दिगंबर वस्ताद, पं. जी. एल. कामत अशा अनेकांकडून एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी विद्या मिळवली. 

१९५५ मध्ये आकाशवाणीमध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत तबलावादक म्हणून काम केले. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केलेच; त्याचबरोबर कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी १९५४ पासून साथसंगत करण्यास सुरूवात केली आणि प्रदीर्घ काळ ती सुरू होती. शास्त्रीय गायनापासून ते नृत्यापर्यंतच्या आणि संगीत नाटकांपासून ते अभंगवाणीतील ‘इंद्रायणी काठी’सारख्या रचनेपर्यंतच्या अनेकविध कलाप्रकारांना समर्थपणे साथ देणाऱ्या चंद्रकांत कामत यांची तबल्यावर विलक्षण हुकमत होती, त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘अनुभवसिद्ध लययात्री’ असा करण्यात येत असे. 

सवाई गंधर्व संगीत महोत्सव, सुधीर फडके यांचे ‘गीतरामायण’, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर यांची भावगीते, सुलोचना चव्हाण यांची लावणी, बेगम अख्तर-गिरीजादेवी यांची ठुमरी अशा विविध कार्यक्रमांमध्ये कामत यांची संगत विशेष रंगत आणीत असे. चंद्रकांत कामत यांनी रंगपटापासून ते स्त्री भूमिका करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या. मराठीप्रमाणेच काही हिंदी, उर्दू नाटकांतही त्यांनी काम केले. प्रत्येक कार्यक्रमाचा बाज आणि शैली लीलया पेलून ते तो कार्यक्रम जिवंत करीत. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. 

त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले. पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला. चंद्रकांत कामत यांचे दोन्ही चिरंजीव भरत कामत आणि सुभाष कामत त्यांचा तबलावादनाचा वारसा पुढे चालवत आहेत. २८ जून २०१० रोजी चंद्रकांत कामत यांचे निधन झाले. 

- संजीव वसंत वेलणकर, पुणे  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZQWCG
Similar Posts
अजित आगरकर, दादा साळवी, मोतिलाल क्रिकेटपटू अजित आगरकर, मराठी चरित्र अभिनेते दादा साळवी आणि हिंदी अभिनेते मोतिलाल यांचा चार डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
मनोहर जोशी, बोमन इराणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि लोकप्रिय अभिनेते बोमन इराणी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन..... .
आशा काळे, अमृता खानविलकर, रझा मुराद, गीता दत्त मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उत्तम नर्तिका आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते रझा मुराद, गायिका गीता दत्त यांचा २३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language